काबूल – अफगाणिस्तानमधील तालिबानच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आणि 27 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हैबतुल्ला अखुनझादाच्या आदेशानुसार या नव्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे, असे तालिबानचा प्रवक्ता झबिबुल्ला मुजाहिद याने सांगितले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात दोन डझन वरिष्ठ अधिकाऱ्यांना मंत्री आणि उपमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
मौलवी शहाबुद्दीन देलावर याला खाण आणि पेट्रोलियम खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून नियुक्त केले गेले आहे. तर मुल्ला मोहंम्मद अब्बास अखुंद याला आपत्ती व्यवस्थापन खात्याचा प्रभारी मंत्री केले गेले आहे. अन्य 25 जणांना उपमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
यामध्ये सरकारी खरेदी, शिक्षण, लेखापरीक्षण कार्यालय, तुरुंग प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, सनदी सेवा आयोग, सीमा आणि आदिवासी भाग विकास, शहिद आणि अपंग कल्याण, ग्रामीण पुनर्वसन आणि विकास, माहिती आणि सांसकृतिक मंत्रालयातील अर्थ आणि प्रशासन, युवक व्यवहार, संवाद, रेड क्रॉस, कंदहारमधील अल बद्र कॉर्प्स, हेमंड प्रांतातील आझम कॉर्प्स, उर्जा आणि पाणी व्यवस्थापन या खात्यांच्या उपमंत्र्यांचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला तालिबानने अफगाणिस्तानचे नामकरण “इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे केले आहे. त्यानंतर 33 सदस्यांच्या हंगामी मंत्रिमंडळाची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यातच तालिबानने या हंगामी मंत्रिमंडळात आणखीन 17 मंत्रांचा समावेश केला होता. आतापर्यंत तालिबानच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा किंवा पूर्वीच्या सरकारमधील कोणाही राजकीय नेत्याचा समावेश नाही.