सातारा – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.
जावळी सोसायटी मतदारसंघातू त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. बँकेच्या ११ जागा बिनविरोध झाल्या तर दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली. जावळी प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातील मतांची मोजणी प्रथम झाली. त्यात आमदार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. एकूण ४९ मतांपैकी ४८ मते वैध ठरली. एक मत अवैध होते. शशिकांत शिंदे यांना २४ तर ज्ञानदेव रांजणे यांना २५ मते मिळाली.
दरम्यान, आमदार शिंदेंच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच जोरजोरात घोषणा देण्यात आल्या आहेत. या दगडफेकीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे.