पुणे – दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कचरावेचकांच्या “स्वच्छ’ संस्थेला तात्पुरती एक वर्षांचीच मुदतवाढ देण्याचा निर्णय सोमवारी मुख्यसभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे कचरा वेचकांचे मुलभूत अधिकार हिरावून घेऊन, फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप करत एक वर्षाच्या तात्पुरत्या मुदतवाढीचा “स्वच्छ’ संस्थेने जाहीर निषेध केला आहे.
पुण्यातील “स्वच्छ’ या महापालिका, कचरा वेचक आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या अनोख्या कचरा व्यवस्थापन पद्धतीचा सन्मान “स्वच्छ सर्वेक्षण 2021′ मध्ये देश पातळीवर करण्यात आला. यात कचरा वेचकांच्या सहभागाचा मोठा वाटा असल्याचे “स्वच्छ’ संस्थेचे म्हणणे आहे.
जून आणि ऑगस्टमध्ये ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली कचरावेचकांनी आंदोलनही केले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी “स्वच्छ’शिवाय पुण्यात कचरा व्यवस्थापन होऊ शकत नाही. “स्वच्छ’ सोबत दीर्घकालीन करार आणि कचरा वेचकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे आश्वासन दिले. परंतु, आता “स्वच्छ’ला वर्षभर मुदतवाढ देत फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे कचरावेचक संतप्त झाले आहेत, अशी प्रतिक्रिया “स्वच्छ’ ने दिली आहे.
फक्त वर्षभराची मुदत देणे म्हणजे आमच्या जीवाशी खेळ आहे. या निराशाजनक निर्णयाबाबत “कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत’ आणि “स्वच्छ’ संस्थेच्या कार्यकारी समितीमध्ये गंभीरपणे विचार करून पुढील पाऊल उचलले जाईल.
– डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते