पुणे – प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी असलेली पन्नास टक्के गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने दिली.
अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या इयत्ता पहिली ते दहावीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. शाळास्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर असून जिल्हास्तरावर अर्ज पडताळणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळा स्तरावरुन तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत. त्यामध्ये प्रामुख्याने सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले पालकांच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावर एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची सूचना विद्यार्थ्यास एक संधी देण्यात यावी.
विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चूकीची भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट आढळल्यास अर्ज फेकमार्क करावे. शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार माहिती पोर्टलवरती भरावी, अशा सूचना अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील, शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी क्षेत्रीय अधिकारी व शाळांना दिल्या आहेत.
नवीन अर्जातून महाराष्ट्र राज्याकरिता विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती कोटा 2 लाख 85 हजार तका आहे. राज्यातून आतापर्यंत नवीन 2 लाख 56 हजार 219 आणि नूतनीकरणाचे 5 लाख 31 हजार 852 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. करोनामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांकरीता पन्नास टक्के गुणांची अट शिथिल केली आहे. शाळा व जिल्हा अशा दोन स्तरावर अर्जाची पडताळणी होणार. मुदतीत दोन्ही स्तरावरील अर्जाची पडताळणी करणे बंधनकारक आहे.