लखनौ – एखादी व्यक्ती मृत घोषित केली मात्र ती नंतर जिवंत असल्याच्या अनेक दंतकथा आपण यापूर्वी ऐकल्या असतील. अशीच एक गोष्ट उत्तर प्रदेशात घडली आहे. रस्ते अपघातानंतर एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या 45 वर्षीय व्यक्तीचे नाव श्रीकेश कुमार असे आहे. त्याचे नातेवाईक येईपर्यंत हा मृतदेह नंतर शवागारात ठेवण्यात आला.
पोलीस आणि नातेवाईक आल्यानंतर पोस्टमॉर्टेमसाठी हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तेंव्हा हा माणूस जिवंत असल्याचे आढळून आले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी ही माहिती दिली. हा माणूस जिवंत असताना त्याला मृत कसे घोषित केले गेले, याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. दरम्यान श्रीकेश कुमार यांच्यावर आता उपचार सुरू असून ते सध्या बेशुद्धावस्थेत आहेत.