धुळे – राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या 17 दिवसांपासून संप सुरुच आहे. संप मागे घेण्यासाठी एसटी महामंडळाकडून निलंबनाची कारवाई करण्याचा सपाटा सुरु आहे. याशिवाय दबावतंत्राचा वापर करून एसटी रस्त्यावर धावण्यास कर्मचाऱ्यास भाग पाडले जात असल्याचे सद्या चित्र आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यास एकिकडे निलंबनाची भीती तर दुसरीकडे पोलीस संरक्षणात एसटी रस्त्यावर घेऊन येण्याची भीती अशा दुहेरी संकटात हे कर्मचारी सापडले आहे.
अशा तणावात हा कर्मचारी असून संपादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये काही कर्मचाऱ्यांचा जीव सुद्दा गेला आहे. राज्यातील अनेक आगारातील अशी प्रकरणे रोजच समोर येत आहेत. आतापर्यंत चार ते पाच एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. असे असताना आज सुद्दा दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तरु दुसऱ्या कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धुळे व जळगाव आगारातील हे कर्मचारी आहेत. धुळे येथील 40 वर्षीय एसटी चालकास हृदयविकाराचा झटका आला असून त्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पचोरा येथील दिलीप महाजन यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यात एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण करण्यात यावे या मुख्य मागणीसह अन्य् मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गेल्या 17 दिवसांपासून हा संप सुरु आहे. मात्र यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे. याशिवाय आणखी किती कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागणार आहे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे.