पुणे – एस.टी. महामंडळाच्या डेपोत कामाला असलेल्या व्यक्तीची आठ लाख 65 हजाराची फसवणूक करण्यात आली. त्याच्या पॅनकार्डचा वापर करुन खासगी बॅंकेत खाते उघडून कर्ज घेण्यात आले होते. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विरेंद्र बबनराव रणवरे(51, रा.धनकवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पॅनकार्डचा वापर करुन एचडीएफसी बॅंकेत खाते उघडले होते. त्यानंतर बॅंकेच्या गोवा शाखेतून सहा वेळा वेगवेगळ्या कारणांसाठी आठ लाख 65 हजार रुपयांचे कर्ज काढले. फिर्यादीचे बॅंक सिबील रेकॉर्ड खराब होऊन त्यांचे एसबीआयचे बॅंक खाते होल्ड करण्यात आले होते. यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. हे कर्ज 2013 पासून घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपीने फिर्यादीच्या पॅनकार्डवरील छायाचित्र बदलले. तेथे स्वत:चे छायाचित्र वापरुण बॅंकेत खाते उघडले. यानंतर कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सय्यद मुलाणी करत आहेत.