पुणे – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा “पॉक्सो’ कायद्यानुसार (बाललैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा) न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
राकेश हिरामण चव्हाण (वय 28, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना जानेवारी 2016 मध्ये नळस्टॉप चौक व सुतारदरा परिसरात घडली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शिल्पा लंबे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरोधात मार्च 2016 मध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते.
या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी, पीडित मुलगी, पंच, साक्षीदार, डॉक्टर व तज्ज्ञ साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्याच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयीन कामकाजासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, फौजदार एस. डी. राक्षे, हवालदार डी. वाय. गायकवाड यांनी सहाय केले.