पुणे- भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीवरील दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर घडली. श्रेयस युवराज कोकणे असे बालकाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा तसेच त्याचा मित्र विवेक सूर्यवंशी (रा. लोणीकंद) जखमी झाला.
अपघातानंतर पसार झालेल्या जीपचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा त्याचा मामाचा मुलगा श्रेयस, मित्र विवेक सूर्यवंशी नगर रस्त्यावरून निघाले होते. वाघोलीजवळ भरधाव जीपने दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा आणि सहप्रवासी सूर्यवंशी यांच्या मधोमध बसलेला श्रेयस दुचाकीवरून फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या श्रेयसचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीन मुलगा, त्याचा मित्र सूर्यवंशी जखमी झाला असून पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करत आहेत.