चंदीगड – पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अभिनेता सोनू सूद याने आज त्याची बहीण मालविका सूद राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये सोनूने याबाबतची माहिती दिली.
सोनूची बहीण मालविका राजकारणामध्ये प्रवेश करणार असल्याचे जरी स्पष्ट करण्यात आले असली तरी ती कोणत्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करेल याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
सिल्व्हर स्क्रीनवर बऱ्याचदा व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या सोनूने लॉकडाउनच्या काळामध्ये खऱ्याखुऱ्या आयुष्यातील नायकाची भूमिका साकारली होती. लॉकडाउनच्या संकटात अनेकांना मदतीचा हात पुढे केल्याने सोनूचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सोनू सूदने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा करताना पंजाब येथील वाढत्या डेंगू रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं म्हंटलं. ही मदत समाजातील आर्थिकदुर्बल घटकांना देण्यात येणार आहे.
यावेळी सोनूने त्याची बहीण मालविका राजकारणात प्रवेश करत असली तरी लोकांनी त्यांना वाटले तरचं मालविकाला मतदान करावे असं म्हंटल. लोकांनी मतदान करताना मी काय सांगतोय अथवा इतर कोणी काय सांगतंय हे न ऐकता त्यांचं मन काय सांगतंय हेच ऐकायला हवं.