पुणे – हॉटेलमधील कर्मचाऱ्याला घरी जाऊन शिवीगाळ करीत दांडक्याने मारहाण करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ‘आर. के. बिर्याणी हाऊस’च्या मालकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकाने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर कर्मचाऱ्याने दुसऱ्या दिवशी गळफास घेतल्याची घटना घडली होती.
राजू परदेशी (रा. भारती विद्यापीठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, प्रभाकर कांबळे (३८) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रभावती कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ही घटना सप्टेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा ते २१ ऑक्टोंबर या कालावधीत घडली.
कांबळे हे आर. के. बिर्याणी हाऊस मध्ये मागील दोन ते तीन वर्षांपासून कामाला होते. मात्र, सप्टेंबर महिन्यातील काही दिवस काही कारणास्तव ते कामावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे बिर्याणी हाऊसचे मालक परदेशी हे मध्यरात्री कांबळे यांच्या घरी आले. यावेळी त्यांनी कांबळे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच, जिवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी (२१ ऑक्टोंबर) कांबळे यांनी घरातील लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बिर्याणी हाऊसचे मालक परदेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशिष कवठेकर करीत आहेत.