कोलकाता – कोलकाता येथील टुकटुकी दासचे आई-वडील तिला नेहमी सांगत असत की, जर तिने भरपूर अभ्यास केला तर ती तिला हवे ते मिळवू शकेल. तिने शिक्षिका व्हावे अशी त्यांची इच्छा होती. टुकटुकीने कठोर अभ्यास करून परीक्षेत चांगले यश मिळविले. इंग्रजीमध्ये एमए केले. परंतु एमएची पदवी असूनही टुकटुकीला नोकरी मिळाली नाही.
– टुकटुकीने हाबरा स्टेशनवर सुरु केली चहाची टपरी
टुकटुकी दासने नोकरीसाठी अनेक परीक्षा दिल्या, सर्व प्रयत्न केले, पण यश मिळाले नाही. शेवटी तिने चहा विकण्याचा निर्णय घेतला. तिने उत्तर 24 परगणा येथील हाबरा स्टेशनवर चहाची टपरी सुरु केली. स्टेशनवर टुकटुकीच्या टपरीचा बॅनर दिसतो ज्यावर ‘एमए इंग्लिश चायवाली’ असे लिहिलेले आहे.
टुकटुकीचे वडील ड्रायव्हर आहेत आणि आईचे छोटे किराणा दुकान आहे. सुरुवातीला ते टुकटुकीच्या चहा विकण्याच्या निर्णयावर नाराज होते. मात्र नंतर त्यांनी सहमती दर्शवली. टुकटुकीने इंटरनेटवर ‘एमबीए चायवाला’ची कथा वाचली होती. त्यापासूनच तिला प्रेरणा मिळाल्याचे ती सांगत.
View this post on Instagram
– ‘एमए चायवाली’ नाव का ठेवलं?
टुकटुकी म्हणाली की, मला वाटले की कोणतेही काम छोटे नसते आणि म्हणूनच मी ‘एमबीए चायवाला’ प्रमाणे माझ्या चहाच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. सुरवातीला जागा शोधणे अवघड होते पण नंतर मी ती शोधण्यात यशस्वी झाले. आता मी चहा आणि नाश्ता विकते, माझ्याकडे एम.ए.ची पदवी आहे, म्हणून मी दुकानाचे नाव असे ठेवले आहे.
टुकटुकीचे वडील प्रशांतो दास म्हणाले, ‘सुरुवातीला मी तिच्या निर्णयावर खूश नव्हतो, कारण ती शिक्षिका होईल या आशेने आम्ही तिला शिक्षण दिले होते. मी विचार केला की जर तिचा स्वावलंबी होण्याचा निर्णय असेल तर ते चांगले आहे. आणि तीला परवानगी दिली.
टुकटुकी तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील चालवते. तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. टुकटुकी तिच्या व्हिडिओमध्ये म्हणते की मी व्हायरल झाल्यापासून बरेच लोक मला भेटायला येतात, लोक मला प्रोत्साहन देतात, ते माझ्यासाठी खुप प्रेरणादायी आहे. आज बरेच लोक माझ्या घरी लग्नासाठी मागणी घालत आहेत. माझ्या आईवडिलांना वाटत होते की ही चहा विकते हिच्यासोबत लग्न कोण करणार? पण लग्नासाठी आता लाईन लागली आहे.