ऐझॉल – भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये नेमण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांची दोन प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. यातील एक प्रकरण सत्तेच्या गैरवापराचे होते तर दुसरे प्रकरण बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या संबंधातील होते.
झोरामथंगा यांच्या विरोधात दोन सामाजिक संघटनांनी सन 2009 मध्ये हे खटले दाखल केले होते. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही झोरामथंगा यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणात अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले होते.
झोरामथंगा यांनी सन 2003 च्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता 54 लाख 18 हजार रुपयांची असल्याचे म्हटले होते नंतर ती 2008 च्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात 1 कोटी 38 लाख इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही वाढ कशी झाली याचे वैध कारण त्यांनी दिले नाही असा त्यांच्यावर मुख्य आरोप होता. तथापि सबळ पुराव्या अभावी त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्त केले.