मुंबई – अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन केवळ 20 लाख रुपयांत नवाब मालिक यांनी खरेदी केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला. तसेच, हसिना पारकर यांचा खास माणूस असणारा सलीम पटेल कोण होता, त्याने इतक्या कमी किमतीत जमीन का विकली? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
दिवाळीनंतर तुमच्यासमोर काही गोष्टी आणेन असे सांगितले होते मात्र, कागदपत्रे गोळा करण्यात वेळ लागल्याने थोडा उशीर झाल्याचे सांगून पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, हा अत्यंत गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे.
मोहम्मद अली इशाक पटेल उर्फ सलीम पटेल या गुन्हेगाराशी नवाब मलिक यांनी यांनी व्यवहार केल्याचा आरोप करून फडणवीस म्हणाले, आर. आर. पाटील हे एकदा इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात आर. आर. पाटील यांचा दोष नव्हता. पण दाऊदचा माणूस म्हणून ज्याचा फोटो व्हायरल झाला होता तो हाच सलीम पटेल. तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड, ड्रायव्हर, फ्रंटमॅनही होता. हसीना पारकरला 2007मध्ये अटक झाली, तेव्हा सलीम पटेललाही अटक झाली. दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची. सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ ऍटर्नी करून पैसा गोळा करायचा असे फडणवीस यांनी सांगितले.
कुर्ल्यामध्ये 2.80 एकर म्हणजेच 1 लाख 23 हजार चौरस फुटांच्या गोवावाला कंपाऊंड या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर आहेत. त्याची विक्री सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांनी मिळून सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये 2019मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
सरदार शहावली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो तुरुंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्वात तो फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला. बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे, याची रेकी त्याने केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाच्या कारस्थान रचताना तो उपस्थित होता. मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्याने आरडीएक्स भरल्याबद्दल न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली, असे सवाल त्यांनी केली.
20 लाखांत 3 एकरच्या जमिनीचा व्यवहार
कुर्ल्याच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीवेळीच एलबीएस रोडवरची ही जमीन रेडीरेकनर रेट 8500 आणि मार्केट रेट 2053 रुपये प्रती चौरस फूट दराने घेतली गेली. ही जमीन 30 लाखात खरेदी केली गेली. त्यातही 15 लाखांचे पेमेंट हे मालकाला न मिळता त्यांचा पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर सलीम पटेलच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर 10 लाख रुपये शहावली खान ज्याला सरदार खान म्हणतात, त्याला मिळाले. त्यातही 5 लाख नंतर मिळतील असं लिहिले म्हणजे 20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकरच्या जमिनीचा व्यवहार झाला. हा व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते, असे फडणवीस म्हणाले.
मलिक यांना सवाल
सलीम पटेल कोण आहे, यांची तुम्हाला माहिती नव्हती का?
गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली?
मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन खरेदी का केली?
कोणत्या कारणामुळे 3 एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली?
या आरोपींवर टाडा होता. टाडानुसार आरोपीची मालमत्ता सरकार जप्त करते. ती जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्स्फर केली का?