पुणे – झांबिया देशात वह्या, इलेक्ट्रिकल माल, पाइप आदी वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे सांगून 7 कंटेनर माल मागवून घेतला. तसेच, पुणे शहरातील 9 व्यावसायिकांची तब्बल 3 कोटी 30 लाख 58 हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
प्रविण वसंत माटे (रा. कोथरूड) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह एजाज रियाज शेरकर (वय 49, रा. कोंढवा आणि लुसाका, झांबिया) यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विकास मनोहर सावंत (वय 59, रा. मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन परिसरात जुलै 2016 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी एजाज शेरकर आणि प्रविण माटे यांनी जुलै 2016 मध्ये फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच झांबिया या देशात वह्या, सॅनिटरी नॅपकिन, इलक्ट्रिकल माल, पीव्हीसी पाइप आदी मालाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे असे सांगितले.
त्यानंतर 7 कंटेनर भरून माल समृद्धी इन्व्हेस्टमेंट व लॉगवॉक झांबिया या कंपनीच्या नावे मागवून घेतला. दरम्यान, या व्यवहारातील केवळ 43 हजार यु.एस.डॉलर्स परत केले. मात्र, उर्वरित रक्कम परत न करता फिर्यादींची 1 कोटी 63 लाख 49 हजार रुपये आणि इतर 8 व्यावसायिकांची 1 कोटी 67 लाख रुपये अशी एकूण 3 कोटी 30 लाख 58 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक सरकारी वकील सुनील यांनी हांडे यांनी जामीन फेटळण्याची मागणी केली.