विवेकानंद काटमोरे
हडपसर : हडपसर साडेसतरानळी गोसावी वस्ती येथील बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभाग यशस्वी झाले आहे. मंगळवारी (दि.२६) पहाटे एका तरुणांवर हल्ला करून हा बिबट्या तेथेच दबा धरून बसला होता. दिवसभर शोध घेऊन रात्री साडेदहा वाजता त्याला जेरबंद करण्यात आले आहे.पकडलेल्या त्या बिबट्याला कात्रज उद्यानात सोडून देण्यात आले आहे.
साडेसतरानळी येथील गावदेवी मंदिर परिसरात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केला होता रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरुन काही मीटर अंतरावरच भरवस्तीत दोन घरांच्या बोळीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे येथील नागरिकांना दिसले.
सावध झालेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व वनविभागाला कळवले.येथील वस्तीमध्ये राहणारे सचिन आटोळे व विश्वास गायकवाड यांच्या घरामध्ये असलेल्या बाेळीत हा बिबट्या आढळून आला.बिबट्या काहीसा जखमी अवस्थेत असल्यामुळे तो तेथे थंडपणे बसलेला होता.नागरिकांची चाहूल लागताच त्याने गुरगुरणे सुरू केले.
वनविभागाच्या अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीमने दाट गनच्या साहाय्याने बिबट्यास बेशुद्ध केले.रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्यास जेरबंद करण्यास यश मिळाले. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास कात्रज सर्प उद्यान येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
वन विभागाचे बिबट्याला पकडण्याचे हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर बिबटयाला कात्रज येथील वन्यप्राणी अनाथालयात नेण्यात आले. हल्ल्याला प्रतिकार केल्यावर बिबट्या जवळच्या गवताळ भागात निघून गेला होता. या बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत एक जण जखमी झाला आहे.