ढाका – बांगलादेशात हिंदुंवर हल्ले होण्याचे जे प्रकार घडले होते त्यातील दुसऱ्या प्रमुख सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. शैकत मोंडल असे अटक केलेल्याच नाव असून हा या हल्ल्यांच्या मुख्य सूत्रधारापैकी आहे.
त्याने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात लोकांना भडकावण्याचे काम केले होते त्यातूनच दुर्गापुजेच्या काळात हिंदुंच्या उत्सवाच्या ठिकाणी हल्ले झाले तसेच हिंदुंची घरेही जाळण्याचा प्रकार घडला होता. तो आणि त्याच्या साथीदाराला रॅपिड ऍक्शन बटालियनने शनिवारी ढाक्या जवळील गाझीपुर येथे अटक केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्वाचा सूत्रधार इक्बाल हुसेन यालाही कॉक्स बझार भागातून या आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानेच कमिला येथील दुर्गा पुजेच्या मंडपात कुराणाची प्रत नेऊन ठेवली होती.
पोलिसांनी या दंगल प्रकरणात आत्तापर्यंत सहाशे लोकांना अटक केली आहे. या हिंदु विरोधी दंगलींना सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आल्याचे लक्षात आल्याने त्यांचीही धरपकड सध्या तेथे सुरू आहे.