मुंबई – आयपीएलमध्ये नवीन संघ खरेदी करण्यासाठीची स्पर्धा आता जास्तच रुंदावत जात आहे. आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. यातील लिलावात एक संघ विकत घेण्याची इच्छा बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीने व्यक्त केली आहे.
नवीन संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत केवळ दोन कंपन्या होत्या, परंतू आता यासाठी तब्बल 12 संस्था शर्यतीत सहभागी झाल्या आहेत. त्यात इंग्लंडमधील मॅंचेस्टर युनायटेड या सर्वात श्रीमंत फुटबॉल क्लबनेही तयारी केली आहे.
आयपीएल आणि बॉलीवूडचे नाते सर्वश्रुत आहे. त्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाची मालकी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान आणि जुही चावला यांच्याकडे आहे. तसेच अभिनेत्री प्रिती झिंटा ही पंजाब किंग्ज संघाची सह मालकीण आहे.
दीपिका आणि रणवीर यांनी या नवीन संघ खरेदीसाठी तयारी केली आहे. दीपिकाची पार्श्वभूमी क्रीडा क्षेत्राचीच आहे. भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण हे दीपिकाचे वडील आहेत. याव्यतिरिक्त रणवीर सिंग देखील इंग्लिश प्रीमिअर फुटबॉल लीगशी संबंधित आहे.
24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर 25 ऑक्टोबरला बीसीसीआय दोन नवीन संघांच्या मालकी हक्कांबद्दल घोषणा करणार आहे. याचदरम्यान बीसीसीआय 2023 ते 2027 सालापर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करणार आहे.
दोन नवीन संघाच्या विक्रीतून बीसीसीआयला साधारण 3 हजार ते साडेतीन हजार कोटींच्या फायद्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 25 तारखेला नवीन संघांची मालकी कोणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.