शारजा – वनिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा, महेश तिक्षणा व दुष्मंत चमिरा यांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने नेदरलॅंडचा डाव अवघ्या 44 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कुशल परेराने केलेल्या नाबाद 33 धावांच्या खेळीमुळे श्रीलंकेने हा सामना 8 गडी राखून 45 धावा करत जिंकला व टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 12 गटात प्रवेश केला.
नाणेफेक जिंकत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. नेदरलॅंडच्या कॉलिन ऍकरमनच्या 11 धावांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर उभे राहता आले नाही. तसेच बेन कुपरने व स्कॉट एडवर्डने 8 धावा केल्या. या दोन फलंदाजांनी गेल्या मोसमापासून सातत्याने सरस कामगिरी केली होती. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्यांनी आपली गुणवत्ता अनेकदा सिद्ध केली आहे.
मात्र, शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या लढतीत मात्र, त्यांना साफ अपयश आले. संघाच्या केवळ 3 धावा असताना स्टिफन मेबर्ग बाद झाला आणि त्यांनंतर त्यांचा एकही फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. त्यांचा डाव केवळ 10 षटकांत अवघ्या 44 धावांत संपूष्टात आला. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगा व लाहिरु कुमारा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. महेश तिक्षणाने 2 बळी घेतले तर, दुष्मंत चमिराने 1 गडी बाद केला.
श्रीलंकेच्याही डावाची सुरूवात खराब झाली. संघाच्या 7 धावा असताना पाथुम निसांका खातेही न उघडता बाद झाला. त्यानंतर कुशल परेरा व चरिता असालंका यांनी डाव सावरला. मात्र, असालंका विनाकारण उंचावरून फटका खेळण्याच्या प्रयत्नात 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर परेराने अविष्का फर्नांडोसह संघाला विजय मिळवून दिला. परेराने नाबाद 33 धावांच्या खेळीत 24 चेंडूत 6 चौकार फटकावले. त्याला साथ देताना फर्नांडोने नाबाद 2 धावा केल्या. नेदरलॅंडकडून ब्रॅंडन ग्लोवर व पॉल वॅन मेकरीयन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – नेदरलॅंड – 10 षटकांत सर्वबाद 44 धावा. (कॉलिन ऍकरमन 11, लाहिरु कुमारा 3-7, वनिंदू हसरंगा 3-9, महेश तिक्षणा 2-3, दुष्मंत चमिरा 1-13). श्रीलंका – 7.1 षटकांत 2 बाद 45 धावा. (चरिता आसालंका 6, कुशल परेरा नाबाद 33, अविष्का फर्नांडो नाबाद 2, ब्रॅंडन ग्लोवर 1-12, पॉल वॅन मेकरीयन 1-20).