संगमनेर – बोगस कर्ज प्रकरणांच्या आधारे तब्बल 56 लाख रुपयांचा घोटाळा युनियन बॅंकेत झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यूनियन बॅंकेच्या संगमनेर शाखा व्यवस्थापकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह बॅंकेच्या एक खिडकी सुविधा केंद्राचा संचालक व सुकेवाडीतील मध्यस्थाविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यूनियन बॅंकेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक समाधान पवार (रा.चैतन्यनगर, संगमनेर) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार हा अपहाराचा प्रकार सन 2011 ते 2013 या कालावधीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील बॅंकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार व बॅंकेच्या एक खिडकी सुविधा केंद्राचा संचालक रुपेश आर. धारवाड या दोघांनी खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे (रा.गणपती मळा, सुकेवाडी) याच्याशी संगनमत करुन हा आर्थिक घोटाळा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यूनियन बॅंकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक नितीन कुमार, एक खिडकी योजनेचा संचालक रुपेश आर. धारवाड व खासगी मध्यस्थ विलास एल. कुटे या तिघांनी संगनमताने गुन्हेगारी कट करुन आपल्या आर्थिक फायद्यासाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली व ती खरी असल्याचे भासवून कर्ज प्रकरणे मंजूर करून खोट्या धनादेशांवर बनावट सह्या केल्या. त्याद्वारे बॅंकेची 56 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी या तिघांवरही संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.