मस्कत : टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीत बांगलादेशने ओमानचा 26 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर बांगलादेशच्या मुख्य फेरीत स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राहिल्या आहेत.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 154 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा डाव 9 बाद 127 धावांवर रोखला. फलंदाजांनी केलेल्या कामगिरीनंतर गोलंदाजांनीही जबाबदारी ओळखून खेळ केला. जतिंदर सिंगने चांगली खेळी केली मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रेहमानने 4 गडी बाद केले. तर, शाकिब अल हसनने 3 बळी घेतले. मेहदी हसन व महंमद शफीउद्दीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.
सलामीवीर महंमद नईम व शाकिब अल हसन यांनी दर्जाला साजेशी फलंदाजी केल्यामुळे ओमानविरुद्धच्या साखळी लढतीत बांगलादेशने सर्वबाद 153 धावा केल्या. कर्णधार महंमदुल्लाह याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर महंमद नईमचा अपवाद वगळता त्यांच्या पहिल्या तीनही फलंदाजांनी निराशा केली. भरात असलेले लिंटन दास, मेहदी हसन व नरुल हसन हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नईमची शाकिबसह जोडी जमली. या दोघांनी जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्यांनी खराब चेंडूंवर चौकार व षटकार वसूल केले आणि तिसऱ्या गड्यासाठी 80 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले.
शाकिब 29 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 42 धावा करत बाद झाला. नईमने 50 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार फटकावताना 64 धावांची खेळी केली. त्यानंतर कर्णधार महंमदुल्लाहने आक्रमक फलंदाजी करताना 10 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 17 धावा करत संघाचे दीडशतक फलकावर लावले.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश – 20 षटकांत सर्वबाद 153 धावा. (महंमद नईम 64, शाकिब अल हसन 42, महंमदुल्लाह 17, फैय्याज बट 3-30, बिलाल खान 3-18, कलिमुल्लाह 2-30). ओमान – 20 षटकांत 9 बाद 127 धावा. (जतिंदर सिंग 40, कश्यप प्रजापती 21, महंमद नदीम नाबाद 14, मुस्तफिजूर रेहमान 4-36, शाकिब अल हसन 3-28, मेहदी हसन 1-14, महंमद शफीउद्दीन 1-16).