नांदेड – देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर, भाजपचे सुभाष साबणे, तर वंचित आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत.
देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण 23 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील छाननीअंती 2 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे एकूण 21 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र आहेत. रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनाने निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.