देश 100 कोटी डोसच्या उंबरठ्यावर

करोना लसीकरण मोहिमेत गाठणार महत्वाचा टप्पा

नवी दिल्ली – देशातील नागरिकांना देण्यात आलेल्या करोनालसींची डोस संख्या 97 कोटींवर पोहचली आहे. पुढील काही दिवसांत देश 100 कोटी डोसचा टप्पा गाठेल. त्या अभूतपूर्व क्षणाची घोषणा विमाने, जहाजं, मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवरून केली जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी गुरूवारी एका कार्यक्रमात बोलताना देश 100 कोटी डोसच्या उंबरठ्यावर पोहचला असल्याकडे लक्ष वेधले. तो महत्वाचा टप्पा 18 किंवा 19 ऑक्‍टोबर या दिवशी गाठला जाण्याची शक्‍यता आहे. त्या महत्वपूर्ण क्षणाची घोषणा व्यापक स्तरावरून केली जाणार आहे. तो टप्पा ओलांडल्यानंतर मिशन मोडमध्ये येऊन केंद्र सरकार पहिला डोस घेणारे नागरिक दुसराही डोस घेतील याची निश्‍चिती करण्यासाठी पाऊले उचलणार आहे.

करोना संसर्गापासून अधिकाधिक नागरिकांना संरक्षण मिळावे हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील करोना लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारीपासून झाला. त्या मोहिमेत 18 वर्षांवरील प्रौढ नागरिकांना लसींचे डोस देण्यात येत आहेत. आतापर्यंत देशातील एकूण प्रौढांपैकी 73 टक्के प्रौढांनी पहिला डोस घेतला आहे. तर, दोन्ही डोस घेतल्याने 30 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लवकरच बालकांनाही करोनालसींचे डोस दिले जाण्याची चिन्हे बळावली आहेत.

करोनालसींची निर्यात पुन्हा सुरू; शेजारी देशांना प्राधान्य
भारताने करोनालसींची निर्यात पुन्हा सुरू केली आहे. त्यासाठी शेजारी देशांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि इराणला लसींचे साठे पाठवण्यात आले आहेत. भारतात काही महिन्यांपूर्वी करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे देशातील लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एप्रिलमध्ये लसींच्या निर्यातीला स्थगिती देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.