पुणे- फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत मानसिक त्रास देत महिलेला व्हॉट्सऍप मेसेजवरूनच “तलाक’ दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीवर समर्थ पोलीस ठाण्यात मुस्लीम विवाह (विवाहावरील हक्काचे संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा पती साजिद मगदुम शेख आणि सासू (रा. लोहियानगर, गंजपेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नाना पेठ येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. शेख यांचा तक्रारदार महिलेशी विवाह झाला होता. विवाहानंतर सातत्याने शेख हे पत्नीला माहेरहून कुलर, रॅक आदी साहित्य आणण्याची मागणी करीत होते. तसेच, फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक त्रास देऊन मारहाण करत होते.
तिला मुलीसह तिच्या माहेरी पाठवून देण्यात आले. त्यानंतर तिचा सांभाळ न करण्याच्या उद्देशाने मार्च महिन्यात व्हॉट्सऍपवरुन मेसेज करत तीनवेळा “तलाक’ लिहून बेकायदेशीर “तलाक’ दिला आहे. महिलेच्या अर्जावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक एच. बी. खोपडे करत आहेत.