काबुल – तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा घेतल्यापासून देशात सातत्याने बॉम्बस्फोटचे प्रकार घडत असून हिंसाचारात प्रचंड वाढ झाली आहे. अफगाणिस्तानमधील कुंदुज प्रांतात शुक्रवारी मोठा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. या बॉम्बस्फोटात 12 जण ठार झाले असून असंख्य नागरीक जखमी झाले आहेत.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हा स्फोटा कुंदुज प्रांतातील एका शिया मशिदीजवळ झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत्यूचा आकडा वाढणार असल्याची शक्यता आहे.
यापूर्वी काबुलमधील एका मशिदीबाहेर 3 ऑक्टोबर रोजी जीवघेणा बॉम्बस्फोट झाला होता. ज्यात 5 नागरिक ठार झाले होते. तालिबानी अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, स्फोटात मृत्यू झालेले लोक तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदच्या आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी मशिदीत जमले होते. त्या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतली नसली तरी, इस्लामिक स्टेटवर संशय आहे. ऑगस्ट महिन्यात काबुल ताब्यात घेतल्यापासून आयएसकडून तालिबानवर अनेक हल्ले करण्यात आले आहेत.
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आयएसकडून होणारे हल्ले वाढले आहेत. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी इस्लामिक स्टेटने काबुल विमानतळाबाहेर मोठा बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यात 169 हून अधिक अफगाणी आणि 13 अमेरिकन सैनिक मारले गेले होते.