मुंबई – एकेकाळी भारतीय संघात मधल्या फळीत चमकदार कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या केदार जाधवच्या कारकिर्दीची अखेर आता जवळ आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आधी भारतीय संघातून, नंतर चेन्नई सुपर किंग्ज संघातून बाहेर करण्यात आलेल्या केदारला आता सनरायझर्स हैदराबाद संघातूनही डच्चू मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
चेन्नईकडून गेल्या मोसमात सुमार कामगिरी केल्यावर सातत्याने टीकेचा धनी बनलेल्या केदारचे हैदराबाद संघातील स्थानही आता धोक्यात आले आहे. तो गेल्या काही काळात भारतीय संघाकडूनही खेळलेला नाही. त्याच्या नावाचा आता विचारही संघ निवडीसाठी केला जात नसल्याने त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहेच, पण आता त्याची आयपीएल स्पर्धेतील कारकिर्दीलाही ग्रहण लागले आहे.
गतवर्षी फेब्रुवारीत केदारने भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला होता. त्यात त्याच्या सुमार कामगिरीमुळे त्याला संघात पुन्हा स्थानही मिळवता आले नाही. केदारची कामगिरी फारशी सरस होत नसल्याने आता आयपीएलमध्ये हैदराबाद संघातून त्याला डच्चू दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तसेच यंदाच्या स्पर्धेत हैदराबाद संघ प्ले ऑफच्या शर्यतीतूनही बाहेर गेल्याने पुढील मोसमासाठी नव्या खेळाडूंना जास्त संधी देण्यात येणार असल्याचे संकेत हैदराबाद संघ व्यवस्थापनाने दिले आहेत.
केदारच्याही आधी ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नरलाही त्याच्या सुमार कामगिरीमुळे संघातील स्थान गमवावे लागले होते. तोदेखील पुढील मोसमापासून हैदराबाद संघाचा भाग नसेल हेदेखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे केदारलाही पुढील मोसमासाठी रिलीज केले जाण्याची शक्यता जास्त आहे.