मुज्जफरनगर – उत्तरप्रदेशातील गुज्जर समाज येथील भाजप सरकारला धडा शिकवण्याच्या मनस्थितीत असून हा समाज भाजपला उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असे अवतारसिंह भडाणा यांनी म्हटले आहे.
अवतारसिंह भडाणा हे भाजपचेच माजी आमदार आहेत. आज शुकरताल येथे आयोजित करण्यात आलेल्या गुज्जर समाजच्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपच्या विरोधात साऱ्या गुज्जर समाजाने एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. भाजपच्या राज्यात गुज्जर समाजला अपमानीत करण्यात आले. त्याबद्दल मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी माफी मागितली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
दादरी येथील पुतळ्याच्या वादावरूनही त्यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या वर्षाच्या सुरुवातीलाच भडाणा यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत सुरू केलेल्या आंदोलनाचे त्यांनी जोरदार समर्थन करून केंद्र सरकारने आणलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले जावेत असे त्यांनी म्हटले होते. त्या मुद्द्य्यावरून त्यांनी भाजप सोडली होती.