नवी दिल्ली – तिबेटीयन नागरिकांना लष्करात भरती करण्याच्या प्रयत्नांना चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने अलीकडेच गती दिल्याचे दिसत आहे. या प्रयत्नांना स्थानिक साधूंचा आशिर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. चीनी लष्कराने एसटीयुए म्हणजे स्पेशल तिबेटीयन आर्मी युनिट स्थापण्याची तयारी सुरू केली आहे.
प. तिबेट क्षेत्रातून त्यासाठी विशेष भरती करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यात आले आहेत. या प्रयत्नांना अधिक समर्थन मिळण्यासाठी तिबेटी साधूंना आशिर्वाद देण्याचे आवाहन केले आहे. भारत तिबेटीयन सीमेवर रक्षणासाठी तिबेटीयन सैनिकांचे युमा युनिट तैनात आहे. हे युनिट दशकभरापुर्वी स्थापन करण्यात आले आहे. त्यात सैन्यातून निवृत्त झालेल्यांची भरती केली आहे.
यालमुक युनिट स्थापन करण्याचे चीनचे प्रयत्न सुरू असून हा गट तिबेटी वंशीय बंडखोरांचा आहे. त्यांना पर्वतीय क्षेत्रात तैनात करण्याची योजना आहे. तेथे यापुर्वी मिमांग चेटॉन हा बंडखोरांचा गट कार्यरत आहे. त्यांना प्राथमिक प्रशिक्षण देऊन चुंबी खोऱ्यात तैनात करण्यात आले आहे. हा परिसर त्यांच्या वावराचा असल्याने त्याची त्यांना सखोल माहिती आहे.
चीनच्या या बदलत्या धोरणामागील मुख्य कारण म्हणजे चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीमध्ये चीनच्या पूर्व भागातील जवानांचा समावेश अधिक आहे.
ते किनारावर्ती भागातील असल्याने पर्वतीय थंड प्रदेशात राहणे त्यांना कठीण होते. ते या हवामानाशी जुळवून घेण्यात अयशस्वी होतात. लडाखमध्ये भारता बरोबर झालेल्या संघर्षानंतर चीनने त्यांच्या सैनिकांना 15 हजार फूट उंचीवर तैनात केले. त्यावेळी बहुसंक्य सैनिक आजारी पडले. तिबेटी नागरिकांची भरती करताना त्यांचा दलाई लामा यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे पडताळून पाहिले जात आहे.