चंदीगड – नवज्योतसिंग सिद्धु यांनी काल पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिल्याने जी राजकीय खळबळ निर्माण झाली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपले मौन सोडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंजाबचे नवीन पोलिस महासंचालक आणि ऍडव्होकेट जनरल यांच्या ज्या नियुक्त्या झाल्या आहेत.
त्याला आपला विरोध होता. आपली ही तत्वासाठी व पंजाबच्या लोकांच्या हितासाठीची लढाई आहे असे नमूद करीत त्यांनी या दोन नवीन अधिकाऱ्यांच्या निवडीबाबत आपली नाराजी ट्विटरवरील व्हिडीओवरून व्यक्त केली आहे. आयपीएस अधिकारी इक्बालप्रितसिंग सहोटा यांना पंजाबचे नवीन पोलिस महासंचालक करण्यात आले आहे.
ज्या अधिकाऱ्याने सहा वर्षाच्या चौकशीनंतर बादल यांना क्लीन चीट दिली त्याच अधिकाऱ्याकडे पोलिस दलाचे प्रमुखपद सोपवणे चुकीचे होते असे त्यांनी म्हटले आहे. अकालीदलाच्या काळातील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी जी एसआयटी नेमण्यात आली होती त्याचे प्रमुख पद सहोटा यांच्याकडे होते. व या एसआयटीने माजी मुख्यमंत्री बादल यांना क्लिीन चीट दिली आहे.
नवे ऍडव्होकेट जनरल ए. पी. एस देओल हे जामीनावर आहेत त्यांनाच राज्याचे ऍडव्होकेट जनरल करणेही अयोग्य होते असे सिद्धु यांचे म्हणणे आहे. सिद्धु यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले असले तरी आपण पक्षातच राहणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.