कानपुर – उत्तरप्रदेशातील एक आयएएस अधिकारी धर्मांतराच्या प्रकियेत सहभागी झाला असल्याची बाब एका व्हायरल व्हिडीओ द्वारे निदर्शनाला आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक एसआयटी नेमली आहे.
या अधिकाऱ्याचे नाव मोहंमद इफ्तिकारूद्दीन असे असून या व्हिडीओ मध्ये ते मौलानांशी धर्मांतराच्या बाबतीत चर्चा करताना दिसत आहेत. सर्व घरांमध्ये इस्लाम पोहोचवणे ही मौलवींची जबाबदारी आहे असे ते यात सांगताना दिसत आहेत.
धर्मांतराच्या एका मेळाव्यातही ते सहभागी झालेले दिसले आहेत. हे अधिकारी उत्तरप्रदेश परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानीच हा व्हिडीओ घेतला गेला असल्याचेही यातून दिसत आहे. या संबंधात खुलासा करताना मोहंमद इफ्तिकारूद्दीन यांनी म्हटले आहे की यातील आपल्या वक्तव्याचा विपरीत अर्थ काढण्यात येत आहे. तथापि या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आयएएस अधिकाऱ्याच्या विरोधात उत्तरप्रदेशातील मठ मंदिर समन्वय समितीने राज्य सरकारकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हे कथित व्हिडीओही त्यांच्यावतीने राज्य सरकारला सादर करण्यात आले आहेत. कानपुर विभागाचे पोलिस आयुक्त असिम अरूण यांनी सांगितले की, या व्हिडीओची सत्त्यता पडताळून पाहिली जात आहे.