सोलापूर – कारवाईसाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला वाळू माफियांनी चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिस कर्मचारी गणेश सोनलकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे घडली.
भीमा नदीच्या सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गणेश सोनलकर गेले होते. यावेळी वाळूमाफियांनी सोनलकर यांच्या अंगावर गाडी घातली. यात सोनलकर यांचा जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस कोतवाल यांना वाळू माफियांकडून मारहाण करण्यात आली होती. जे कर्मचारी वाळू उपसा रोखायला जातात त्यांना मारहणा करणे, जीवे ठार मारणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. या वाळूमाफियांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.