चंडीगढ – कॉंग्रेसने पंजाबमध्ये नेतृत्वबदल केल्यानंतर सोमवारी त्या पक्षाचे नेते चरणजितसिंग चन्नी यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारली. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याशिवाय, सुखजिंदरसिंग रंधावा आणि ओ.पी.सोनी या दोघांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
कॉंग्रेस श्रेष्ठींच्या आदेशावरून नुकतेच ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यानंतर येथील राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी, रंधावा आणि सोनी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या सोहळ्याला कॉंग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित होते. मात्र, अमरिंदर यांच्या अनुपस्थितीमुळे त्यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचे समोर आले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनलेले तिन्ही नेते अमरिंदर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. रंधावा हे शीख, तर सोनी हिंदू आहेत. त्यामुळे तिन्ही नेत्यांच्या निवडीतून कॉंग्रेसने समतोल साधल्याचे मानले जात आहे.
अमरिंदर आणि कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील मतभेद मागील काही काळापासून विकोपाला पोहचले. त्यातून अमरिंदर यांच्या मुख्यमंत्रिपदावर गदा आल्याचे मानले जाते. नवे मुख्यमंत्री चन्नी हे सिद्धू यांच्या गटातील मानले जातात. त्यामुळे नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेतून सिद्धू यांचे वर्चस्व सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
पंजाब विधानसभेची निवडणूक अवघ्या चार-पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात कॉंग्रेसने त्या राज्यात नेतृत्वबदल केला. आता अमरिंदर यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान त्या पक्षापुढे आहे.