पुणे – कागदपत्रांची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकाने लोखंडी रॉडने मारहाण करुन पळ काढला. ही घटना विश्रांतवाडी येथील रिक्षा स्टॅंड जवळ शनिवारी घडली. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल मन्हाळकर हे येरवडा वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांनी विश्रांतवाडी चौकात रिक्षा चालक बाबुशा किर्तीवर( 22,रा.विश्रांतवाडी) याला रिक्षाची कागदपत्रे मागितली. यावेळी त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत हुज्जत घातली. यामुळे ते कारवाई करण्यासाठी किर्तीवारला येरवडा वाहतूक विभागात नेत होते. याचा राग आल्याने त्याने रिक्षा चौकात आल्यावर फिर्यादीची कॉलर पकडून रिक्षातील लोखंडी रॉडने मारहाण केली. यानंतर मोबाईलचे नुकसान करुन रिक्षा जोरात घेऊन पळ काढला. रिक्षा घेऊन पळ काढताना, फिर्यादी रिक्षाचा धक्का लागून जखमी झाला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव करत आहेत.
वाहतूक पोलिसास दगडाने मारुन घेतला चावा
सिग्नल मोडणाऱ्या वाहनचालकास थांबवल्याने वाहतूक पोलिसास दगडाने मारहाण करुन त्याच्या दंडाचा चावा घेण्यात आला. ही घटना एरंडवना येथील मंत्री उद्यानाजवळ घडली. याप्रकरणी कोथरुड वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार परमेश्वर पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार मंगेश शमाकांत काळे (29,रा.कोथरुड) याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांनी दिलेल्या माहितीनूसा फिर्यादी पाडळे हे चौकात कर्तव्य निभावत होते. यावेळी आरोपी दुचाकीवरुन सिग्नलचा भंग करुन जात होता. त्याला पाडळे यांनी थांबण्याचा इशारा केला. याचा राग मनात येऊन त्याने दगडाने डोळ्याच्यावर मारहाण करुन दंडाचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.