भोपाळ – देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे घराघरामध्ये आगमन होते. यावेळी मोठ्या भक्तिभावाने १० दिवस गणरायाची पूजा करण्यात येते. घरगुती तसेच सार्वजनिक अशा दोन्ही पद्धतीने गणेश भक्त गणरायाची आराधना करत असतात. सध्या गणेशोस्तव सुरु असून गणपती बाप्पाच्या एका मूर्तीमुळे राजकीय वाद सुरु झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेश येथील ग्वालियर जिल्ह्यातील आपागंज शीतला कॉलनीमध्ये गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीला आरएसएसचा गणवेश घालण्यात आला असून बाप्पा संघाच्या परंपरेप्रमाणे नमस्ते करत असल्याचं दाखवण्यात आलंय. गणपती बाप्पासोबतच उंदराला देखील हा गणवेश घालून नमस्कार करताना दाखवलं आहे. ,मूर्ती पाठीमागे भारतमाता सिंहावर आरूढ असलेला फोटो लावण्यात आलाय.
दरम्यान, या मूर्तीमुळे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने याबाबत विचारणा करताना, ‘धर्माचे बनावट ठेकेदार कोठे गेले? अशी विचारणा केली आहे. भाजपने ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाला राजकीय फायद्यासाठी वापरलं त्याच प्रमाणे आता गणपती बाप्पाला देखील आपले राजकीय हेतू पूर्ण करण्यासाठी भाजपचा हा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
तर दुसरीकडे या गणेशोस्तवाचे आयोजक बलराम सिंह यांनी यामध्ये काहीही वावगे नसल्याचे म्हंटले आहे. आम्ही दरवर्षी गणती बाप्पाची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या रूपात करत असतो. यावेळी बाप्पाच्या मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पोशाख परिधान करण्यात आला आहे. आम्हाला बाप्पाला या रूपामध्ये पाहायचं होत त्यामुळे आम्ही असा देखावा उभारला. यामागे कोणताही विशेष हेतू नाही.