अमिराती – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील उर्वरीत सामन्यांना येत्या 19 सप्टेंबरपासून येथे प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी बायोबबल वातावरण तयार करण्यात आले असले तरीही सुरक्षेच्या दृष्टीने सहभागी संघातील सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच स्पर्धेशी संबंधित सर्व व्यक्तींची दर तीन दिवसांनी करोना चाचणी करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा भारतातच सुरु झाली होती मात्र, सहभागी संघातील काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता ही स्पर्धा अमिरातीत होत असून उर्वरीत 31 सामने बिनधोकपणे पार पडावेत यासाठी ही काळजी घेण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांदरम्यान खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि अन्य संबंधित व्यक्तींच्या 30 हजारपेक्षा जास्त आरटी पीसीआर चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी दुबईस्थित व्हीपीएस हेल्थकेअर कंपनीला जबाबदारी देण्यात आली आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आपत्कालीन वैद्यकीय, क्रीडा औषध तज्ज्ञ आणि हवाई रुग्णवाहिका सेवा देण्याची जबाबदारीही या कंपनीवर सोपवण्यात आली आहे. खेळाडू कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी बायोबबलमधून बाहेर पडणार नाहीत याचीही काळजी घेतली जाणार आहे. दर तिसऱ्या दिवशी आरटी पीसीआर चाचणी घेतली जाईल.