पुणे – महापालिकेस “आर 7′ अंतर्गत मिळालेल्या सदनिकांमध्ये अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना महापालिकेकडून जाहीर नोटीस बजाविण्यात आली आहे. तातडीनं ही घरे रिकामी करावीत अन्यथा घरांमधील साहित्यासह संबंधितांना बाहेर काढण्यात येईल, असे या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतींचा लिलाव करून त्या विक्री करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी आर 7 अंतर्गत ताब्यात आलेल्या सुमारे 1250 मिळकती महापालिका विक्रीस काढणार आहे.
महापालिकेकडून या सदनिका शहरातील रस्ता बांधितांना नाममात्र दराने भाडेकराराने दिल्या जातात. मात्र, महापालिकेकडून या सदनिका घेऊन अनेक जण या सदनिका भाडेकराराने देत त्याचा अनधिकृत वापर करतात.
ही बाब बेकायदेशीर असून अशा सदनिकांधारकांवर कारवाई करून ते रिकाम्या करण्याची प्रक्रीया पालिकेने सुरू केले आहे. त्यासाठी संबधित सदनिकाधारकांना पालिकेने नोटीसा बजाविल्या असून घरे सात दिवसांच्या आत खाली न केल्यास संबधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.