नवी दिल्ली – देशातील निम्म्याहून अधिक प्रौढांना आतापर्यंत करोनालसींचा किमान एक डोस देण्यात आला आहे. तर, दोन्ही डोस मिळाल्याने 16 टक्के प्रौढांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत लसीकरणाविषयीची माहिती दिली.
देशातील नागरिकांना आतापर्यंत सुमारे 67 कोटी डोस देण्यात आले. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, दादरा आणि नगर हवेलीमधील सर्व प्रौढांना एक डोस देण्यात आला आहे. देशातील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 100 टक्के आघाडीवरील कर्मचाऱ्यांना पहिला डोस मिळाला. त्यातील 84 टक्के आरोग्य कर्मचारी आणि 80 टक्के आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
लसीकरण मोहिमेने वेग घेतल्याने एकट्या ऑगस्ट महिन्यात लसींचे 18 कोटींहून अधिक डोस देण्यात आले. त्यामुळे दिवसाला सरासरी जवळपास 60 लाख डोस देण्यात आले. ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात तर ती सरासरी 80 लाखांवर गेली. देशात 27 आणि 31 ऑगस्ट या दोन दिवशी 1 कोटींहून अधिक डोस देण्यात आले.