नवी दिल्ली – देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत 47 हजारहून अधिक नवे करोनाबाधित आढळले. दैनंदिन बाधित संख्येची ती दोन महिन्यांतील सर्वांधिक वाढ ठरली.
केरळमधील बाधित संख्येत सलग काही दिवसांपासून 30 हजारपेक्षा अधिकची भर पडत आहे. ती स्थिती देशाची चिंता वाढवणारी ठरत आहे. याआधी देशात 63 दिवसांपूर्वी (1 जुलै) 48 हजारहून अधिक बाधित आढळले होते.
त्यानंतर प्रथमच नव्या बाधित संख्येने 47 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 28 लाख 57 हजार 937 जणांना करोनाबाधा झाली. मागील 24 तासांत सक्रिय बाधितांची संख्या 11 हजारांनी वाढून 3 लाख 89 हजार 583 वर पोहचली.
त्यांचे प्रमाण एकूण बाधितांमध्ये 1.19 टक्का इतके आहे. देशातील बाधित बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के आहे. मागील काही दिवसांपासून करोना लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. देशातील नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 67 कोटींच्या घरात पोहचली आहे.