पुणे (प्रभात वृत्तसेवा) – शहरात दरवर्षी नव्याने होणाऱ्या वाहनांच्या नोंदीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनकर आकारला जातो. या जमा होणाऱ्या रकमेतील 50 टक्के निधी शहराच्या रस्ते विकासासाठी देण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे केली होती.
या मागणीचे पत्र आरटिओ कार्यालयाकडून राज्यशासनास पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यास रस्ते विकसनासाठी महापालिकेस मोठी मदत होणार आहे.
याबाबत बोलताना बागूल म्हणाले की, करोना संकटाच्या काळात महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत. अशा स्थितीत, महापालिकेकडून उत्पन्नवाढीसाठी वाढीसाठी ऍमिनिटी स्पेस भाड्याने देण्यापेक्षा अशा नवीन कल्पनांच्या आधारे उत्पन्न वाढ करून घेणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरात नोंदविल्या जाणा-या नव्या वाहनांच्या नोंदणी करताना वाहन कराची रक्कम 50 टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेला रस्ते विकासासाठी मिळावी अशी मागणी आरटीओ कडे केली होती.
ही वाहने नोंदणी झाल्यानंतर शहरातील रस्तेच वापरत असल्याने रस्ते सुस्थितीत असल्यास वाहतूक कोंडी तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून शहराला त्याचा फायदा होणार आहे, त्या वाहनकराची 50 टक्के महापालिकेस मिळावी अशी मागणी होती, या मागणी बाबत आरटीओ कार्यालयाकडून राज्यशासनास पत्र पाठविले असून त्याचा पाठपुरवा शासनाकडे करणार असल्याचे बागूल यांनी स्पष्ट केले.