रियाध – सौदीतील अभा विमानतळावर आज इराणमधील हौती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. मात्र हौती बंडखोरांच्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे. ,सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडी येमेनमध्ये हौती बंडखोरांविरोधात लढत असल्याने हा हल्ला करण्यात आला असल्याचे मानले जाते आहे.
गेल्या 24 तासात झालेला हा दुसरा ड्रोन हल्ला आहे. विमानतळावर झालेल्या पहिल्या ड्रोन हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या ड्रोन हल्ल्याच्यावेळी ड्रोन आधुमिक यंत्रणेच्या माध्यमातून पाडण्यात आले. मात्र यावेळी विमानतळावरील विमानाचे नुकसान झाले, असे सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अभा विमानतळावरील विमानांची हवाई वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
हौती बंडखोरांनी येमेनची राजधानी सना ताब्यात घेतल्यानंतर सौदी अरेबियाने येमेनमध्ये हस्तक्षेप केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारला पुन्हा सत्तेवर आणले. यानंतर बंडखोरांनी सौदीतील विमानतळ, लष्करी ठिकाणे आणि तेलाच्या पायाभूत सुविधांवर अनेक हल्ले केले आहेत.