वॉशिंग्टन – काबूलमध्ये काल एका आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेचे तेरा सैनिक मारले गेले आहेत. या सैनिकांच्या बलिदानावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांचा कंठ आज दाटून आला. त्यांच्या तोंडातून शब्द फुटणे अवघड जात होते. डोळे मिटून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. आमच्या सैनिकांची हत्या करणाऱ्यांना शोधून त्यांचा खात्मा केला जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
व्हाइटहाउसवरून राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केले. त्यात त्यांनी अफगाणिस्तानातील कालच्या घटनेचा उल्लेख करीत आपल्या देशाचा शूर जवानांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यावेळी त्यांची अशी अवस्था झाली होती. अमेरिकेने काबूलमधून आपल्या देशाच्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने हाती घेतले आहे. हे काम अगदी सुरळीत सुरू होते किंबहुना त्यात चांगला वेगही आला होता.
आतापर्यंत अमेरिकेने तेथील 95 हजार लोकांना बाहेर काढले आहे. पण काल काबूल विमानतळावर हा आत्मघाती स्फोट झाला. तेथे एकूण दोन स्फोट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यात अमेरिकेचे तेरा सैनिक मारले गेले आहेत तर अन्य अनेक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतरही तेथे अमेरिकन सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला झालेला नव्हता; परंतु कालच्या घटनेने सारे चित्रच पालटून टाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले.
काबूलमध्ये अमेरिकन सैन्यावर झालेला हल्ला हा अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या कारकिर्दीवरचा मोठा ठपका मानला जात आहे. दरम्यान, कालच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांच्या विरोधात इम्पीचमेंट प्रस्ताव आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.