म्हैसूर- कर्नाटकातून संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका मराठी तरुणीवर चौघांनी मिळून सामूहीक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ही म्हैसूरमध्ये वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होती. हा प्रकार म्हैसूरमधील ललिथाद्रीपुरा परिसरात घडला आहे. या घटनेला ४८ तास उलटून सुद्धा आरोपी मोकाटच आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
अत्याचाराचा व्हिडिओ बनवत तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत या नराधामांनी तीन लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच तरुणीच्या प्रियकरालाही बेदम मारहाण केली आहे.
दारूच्या नशेत असलेल्या नराधमांनी पीडित तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिच्या प्रियकराला दगड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हे दोघेही बेशुद्ध पडल्यानंतर या नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर सहा तासांनी या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले असून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.