पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राने (ईएमआरसी) निर्मिलेल्या “कमला-द स्वदेसी न्यूट्रीइंडियन’ या माहितीपटाला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या “विज्ञान प्रसार’ या संस्थेतर्फे दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा “विज्ञान चित्रपट महोत्सव’ ही संकल्पना घेत देशपातळीवर स्पर्धेचे आयोजन केले होते.
नवी दिल्ली येथे ऑनलाइन ही स्पर्धा पार पडली. पुणे विद्यापीठातील “ईएमआरसी’ केंद्राने महिला शास्त्रज्ञ डॉ. कमला सोहोनी यांच्या कार्यावर माहितीपट तयार केला. डॉ. कमला सोहोनी या विज्ञान विषयात केम्ब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ होत्या. देशातील लोकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्या भारतात परतल्या होत्या. भारतीय आहारशास्त्रातील पोषक अन्नद्रव्यांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले आहे.
या महितीपटाचे दिग्दर्शन “ईएमआरसी’चे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी केले आहे. सहायक दिग्दर्शक व संकलन मिलिंद पाटील यांचे आहे. संशोधन आणि संहिता अजिता देशमुख यांनी लिहिली आहे. कॅमेरामन अप्पा चिंचवडे, ध्वनीबाबत राम जाधव व प्रदीप भोसले, सेटनिर्मिती राजेश देशमुख आदींनी सहायक म्हणून काम पाहिले या महितीपटाच्या निमित्ताने डॉ. कमला सोहोनी यांचे भारतासाठीचे योगदान सर्वांसमोर आले आहे. “ईएमआरसी’ने केलेले हे काम कौतुकास्पद आहे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि सहकारी यांनी या फिल्मसाठी उत्तम काम केले, असे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.