नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. नीरजला ताप आला असून घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे.
मात्र, त्याची करोना चाचणी निगेटिव्ह झाली आहे. नीरज सध्या घरी असून आराम करत असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्यानंतर नीरज चोप्रा सोमवारी मायदेशी परतला होता. यानंतर काही दिवसांनी त्याला ताप आला. यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
तसेच डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कोविड-19ची चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच पंजाब आणि हरियाणा सरकारनेही त्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
याशिवाय भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडूनही नीरज चोप्राला गौरविण्यात येणार होते. परंतु तो आजारी पडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.