पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज केला आहे, त्यांनाही अर्जात दुरूस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी प्रकिया राबविली जाते. अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, एमबीए, एमसीए, मास्टर ऑप ऑर्किटेक्चर, पदवी आणि पदव्युत्तर हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
मात्र, सीईटी परीक्षांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले नाहीत. तसेच अपूर्ण अर्ज भरलेले आहेत व काही विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना आता अर्ज करता येणार आहे. त्यासाठी 12 ते16 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जामध्ये विद्यार्थ्यांना आपले पूर्ण नाव, स्वाक्षरी, फोटो आणि परीक्षा केंद्रामध्ये ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या लॉगीनमधून दुरुस्ती करण्यासाठी अंतिम संधी दि.14 ते 16 ऑगस्ट या दरम्यान देण्यात येत आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी दिली.