नवी दिल्ली :पंतप्रधान मोदी भाषण करणार म्हटलं की, अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी देशाला अनेकदा संबोधित केलं आहे. तसेच त्या-त्यावेळी अनेक निर्णय जाहीर केले आहेत. अशातच महिला उद्योजकांना 1 हजार 625 कोटी रुपयांची रक्कम देण्याची घोषणा मोदींनी केली.
पंतप्रधान मोदींनी आज दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशनशी संबंधित महिला स्वयंरोजगार गटांच्या सदस्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले.
मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आत्मनिर्भर नारी शक्ती कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यात त्यांनी महिला उद्योजकांसाठी महत्त्वाची घोषणा केली.
महिलांमधील उद्योजकांना वाव देण्यासाठी, त्यांच्या उद्योगविश्वाची व्याप्ती वाढवण्यासाठी आज मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात येत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. खाद्यपदार्थांवरील प्रक्रिया असो वा महिला शेतकरी उत्पादक संघ असो किंवा मग दुसरे स्वयंरोजगार समूह, महिलांच्या लाखो गटांना 1 हजार 600 कोटी रुपयांहून अधिकची मदत देण्यात आली आहे,असे ते म्हणाले.
कोरोना काळात या बचत गटातील महिलांनी महत्त्वाची काम केली आहे. मास्क, सॅनिटायझपासून अन्नपदार्थांपर्यंत अनेक गरजूंची त्यांनी मदत केली आहे. यामुळे त्यांना स्वत:लाही सक्षम होण्यास मदत झाली आहे.. आम्ही सत्तेत आलो, तेव्हा कित्येक महिलांकडे बँक खातं नव्हतं. त्या बँकिंग यंत्रणेपासून कोसो मैल दूर होत्या. त्यामुळेच आम्ही जनधन खाती उघडली,’ असं मोदींनी यावेळी सांगितले.
याशिवाय ते PMFME (Pradhan Mantri Formalisation of Micro food processing Enterprises) अंतर्गत येणाऱ्या 7,500 बचत गटांना 25 कोटींची आरंभिक रक्कम देखील जारी करतील, अशी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजने अशी माहिती दिली आहे.