नवी दिल्ली: देशात एकीकडे करोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या अशा परिस्थितीत आणखी एक घटना समोर आली आहे ज्यात आरोपींनी निर्दयीपणाचा कळस गाठला असल्याचे दिसत आहे. निर्दयी मुलांनी आपल्या आईचे कपडे फाडले अन् तिला रस्त्यावर फरफटत नेऊन बेदम मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दारूच्या नशेत असणाऱ्या मुलांनी आईला मारहाण करत असताना ती महिला जोरजोरात ओरडत होती. तसेच मुलांना मारू नका अशी विनवणी करत होती. पण दारूच्या नशेत असलेल्या मुलांनी तिचे काहीच ऐकले नाही. ते तिला बेदम मारहाण करतच राहिले. लोकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली होती. याच दरम्यान गावातील काही महिलांनी वृद्ध महिलेची मुलाच्या तावडीतून सुटका केली आहे.
मध्य प्रदेशच्या आगर-मालवा जिल्ह्यात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत दोन मुलांनी आपल्या 80 वर्षीय आईला बेदम मारहाण केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी मारहाणी दरम्यान आपल्याच आईचे कपडे देखील फाडले त्यानंतर घरातून फरफटत त्यांनी वृद्ध आईला रस्त्यावर आणले आणि तिथे गावकऱ्यांसमोर बेदम मारहाण करायला सुरुवात केली.
महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या महिला बाहेर आल्या आणि त्यांनी महिलेला वाचवले. घटनेचा माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. तसेच वृद्ध महिलेला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.