नवी दिल्ली : करोनाबाधितांच्या संख्येत देशभरात हळूहळू वाढ होत असल्याने तिसऱ्या लाटेचे हे संकेत असल्याचे मानले जात आहेत. ऑक्टोबरपर्यंत तिसरी लाट शिखर गाठणार असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेपासून अधिक धोका असल्याचे बोललेत जात आहे. मात्र, नव्या संशोधनानुसार लहान मुलांवर या तिसऱ्या लाटेचा काय परिणाम होतो याविषयी नवीन माहिती आता समोर आली आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना करोनाचा जास्त धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लॅन्सेट या मासिकात या विषयीचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ज्या मुलांना करोना होतो ती सहा दिवसांत बरी होतात. चार आठवड्यांहून अधिक काळ करोनाची लक्षणे राहिलेल्या मुलांचे प्रमाण अवघे ४ टक्के होते.
लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे अल्पकाळ टिकतात, असे अहवालात नमूद आहे. – १७३४ मुलांचा डेटा या अभ्यासासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आला होता. लंडन येथील किंग्ज कॉलेज येथील संशोधकांनी ‘झो कोविड’ स्टडी स्मार्टफोन ॲपचा वापर करून लहान मुलांवर कोरोनाच्या लक्षणांचा अभ्यास केला.
या ॲपवर १७ वर्षांपर्यंतच्या अडीच लाख मुलांचा डेटा उपलब्ध होता. संशोधकांच्या चमूने १ सप्टेंबर २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत संकलित करण्यात आलेल्या अहवालांवर लक्ष केंद्रित केले.
लहान मुलांमध्ये कोरोना फार काळ न टिकता सरासरी सहा दिवसांत बरा होतो.कोरोनाची तीव्र बाधा होत नाही. सौम्य लक्षणे लहान मुलांमध्ये आढळतात. ते लवकर बरे होऊ शकतात.मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले चार आठवड्यांपर्यंत बरे झाले.