फलटण -टोकियो ऑलिम्पिकमध्ये कसब दाखवणाऱ्या भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव यांच्या कुटुंबाला घर बांधण्यास अडथळा निर्माण केला जात होता. हे प्रकरण मिटले असून लवकरच प्रवीण जाधव यांचे घर उभे राहिल, असे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितिन सावंत यांनी सांगितले.
प्रवीण जाधव यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्याचे समोर आले असून धमकाविणारे त्याचे शेजारीच असल्याची माहिती आहे. जाधव यांच्या कुटुंबाला त्यांच्या झोपडीवजा घराची दुरुस्ती करु नये यासाठी धमकी मिळत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जाधव कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे सांगितले होते.
प्रवीणने टोकियो ऑलिम्पिकमध्य लक्षवेधक कामगिरी करीत युवा पिढीपुढे आदर्श निर्माण केला. त्याच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुकही झाले. त्याचे सरडे गाव जागतिक स्तरावर पोहचले. प्रवीणचे कुटुंब पूर्वी झोपडीत राहयचे. त्याने सैन्यात भरती झाल्यानंतर घर बांधले.
या ठिकाणच्या जागेवरुन त्याच्या कुटुंबीयांना यापूर्वीही काही लोकांनी त्रास दिल्याचे प्रवीण सांगतो. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत त्याने पीटीआयला सांगितले की, “एका कुटुंबातील पाच ते सहा लोक आले आणि त्यांनी माझे आई, वडील, काका आणि काकूंना धमकावण्यास सुरुवात केली.
आम्हांला आमचे घर दुरुस्त करायचे आहे. परंतु ते करुन देत नाहीत. सध्या माझे कुटुंब अस्वस्थ आहे आणि मीही तिथे नाही. मी लष्कराच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले आहे आणि ते त्याकडे 100 टक्के लक्ष देत आहेत. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनीही माझ्या कुटुंबाला पूर्ण मदतीचे आश्वासन दिले होते.’ लष्करात असणाऱ्या प्रवीण जाधव याला शेती महामंडळाची 15 गुंठे जागा मिळाली होती.
त्याप्रमाणे प्रवीण याने ऑलिंम्पिकला जाण्यापूर्वी तेथे घर बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र, शेजारी असणाऱ्या बेलदार कुटुंबाने रस्ता ठेवण्यासाठी त्याला हरकत घेतली होती. आणि ते घर बांधायला अडथळा निर्माण करीत होते. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितिन सावंत यांनी सरडे येथे तत्परतेने जाऊन शेजारच्या बेलदार कुटुंबाशी चर्चा करुन हे प्रकरण मिटवले आहे. लवकरच प्रवीण जाधवचे घर उभारेल, असा तोडगा काढला आहे.