मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर देशातील प्रवासी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्मिती झाली. परिणामी शेअर बाजार निर्देशांकांत बरीच वाढ झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 363 अंकांनी वाढून 52,950 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 122 अंकांनी म्हणजे 0.77 टक्क्यांनी वाढून 15,885 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स, इन्फोसिस, टीसीएस या कंपन्यांबरोबरच टायटन, महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, मारुती, इन्फोसिस या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. मात्र टाटा स्टील, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, सन फार्मा, डॉक्टर रेड्डीज, एचडीएफसी बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.
माहिती तंत्रज्ञान, औषधी, रिऍल्टी या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी घडल्या असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये घरांची नोंदणी वाढली असल्याची आकडेवारी जाहीर झाली. या कारणामुळे शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते असे विश्लेषकांनी सांगितले.